बेळगाव | प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली पर्व असलेल्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त बेळगाव शहरात भक्तिभावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले. शुक्रवारी सकाळी ७ वाजता धर्मवीर संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीने हा राज्याभिषेक दिन सोहळा अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास विधिपूर्वक दुग्धाभिषेक व पूजाअर्चेने झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाराजांना मानवंदना देण्यात आली. स्मारक परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने नटलेला होता. महाराजांच्या मूर्तीसमोर भव्य नैवेद्य अर्पण करून उपस्थित शिवभक्तांनी जयघोष केला.
यावेळी बोलताना माजी आमदार अनिल बेनके यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव केला. “१६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजीराजेंचा राज्याभिषेक झाला. अल्प वयात युवराज आणि पुढे छत्रपती बनलेल्या संभाजीराजेंनी स्वराज्य रक्षणासाठी असंख्य युद्धे लढली आणि इतिहासात पराक्रमाचा अजरामर ठसा उमटवला,” असे त्यांनी सांगितले. स्वराज्य आणि स्वधर्मासाठी त्यांनी दिलेले बलिदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही बेनके यांनी नमूद केले.
स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व उलगडले. “स्वराज्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे धर्मवीर संभाजीराजे म्हणजे धैर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. शिवरायांनी जगण्याचा आदर्श दिला, तर संभाजीराजांनी मृत्यूला सामोरे जाण्याचे बळ शिकवले,” असे ते म्हणाले.
या सोहळ्याला नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, स्मारक समितीचे सदस्य, महिला भगिनी, युवक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.









