बेळगाव येथील एस. पी. एम. रोडवरील श्री विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेत शनिवार, दि. 16 मे 2026 रोजी धार्मिक आणि सामाजिक वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 9 वाजता डॉ. सतिश चौलीघर यांच्या हस्ते श्री मंदिरामध्ये महाआरती संपन्न झाली.
यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर रा. सुतार यांच्या हस्ते डॉ. सतिश चौलीघर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. चौलीघर यांनी नूतन मंदिराच्या भव्यतेचे आणि समाजाच्या एकतेचे कौतुक केले.
तसेच श्री विश्वकर्मा समाजाने भारतासह जगाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. सामाजिक बांधिलकी जपत नवजीवन फाऊंडेशनच्या माध्यमातून दर महिन्याला मेडिकल चेकअप कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. गरजू नागरिकांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त, कार्यकारी मंडळ, महिला मंडळ तसेच समाजातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
